“तू सदा जवळी रहा… ” भाग – 13


 

 आत्ता पर्यंत आपण वाचलात…

भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते  ……. 

 भाग -2* बाल मैत्रीण – ज्योतीची  भेट,  पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला  वाटलेली चिंता आणि आठवलेले बालपण….

 भाग-3* शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट….

भाग  – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई – अनुभूती घेतलीत  कुसुम ताई,   सई, चंदाच्या बालपणातील आठवणी….

  • भाग -5*  रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात,  आई विनिताची परीक्षा. प्रश्न नव्हते नि:शब्द शांतता,  प्रार्थना  बळ देते  रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.  

भाग – 6*  रश्मीच्या आईबद्धलच्या संगीतमय आठवणी,  आणि रश्मीचे वैधव्य  सदृश्य जीवन.  

भाग -7 * एक सक्षम महिला असून पण रश्मीनं गप्प राहून का सहन केलं सार ❓️अन्याय,  प्रतारणा,  आर्थिक,   सामाजिक,  मानसिक,  नैतिक अवहेलना.   अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…

भाग-  8* आईच, मानस  दर्शन,  
राजेशची प्रकर्षाने आठवण आली. 

भाग -9*  राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय ग?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचे काय होणार? 

भाग – 10* साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृन्दावन आणि राजू, गाव देवीच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश, रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.

भाग -11* मालिनी वाहिनी – विनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तिन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, लोचन आणि रश्मीचा जन्म.

भाग- 12* मध्ये वाचा,  सुचीताची प्रश्नावली, श्री आणि  विनिता,  घराचं घरपण कस टिकवतात❓️ रश्मी झोपेत का घाबरली❓️ दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का❓️ चंदाला आकाशात काय दिसलं❓️
भाग -13* शंकल दादा, सवाल दे ‼️@रश्मी खोटं बोलते पण…. ?  @ चंदा कुठे राहिली? @ चंद्रयाला पाटलीण बाई चप्पलन का मारते?

शंकल दादा, सवाल दे ‼️


रश्मीला ताईआजींन सकाळी फ़ुलं आणूंन, देवपूजा कशी करायची ते शिकवलं होतं. मंदिरातील लक्ष्मी आणि घरातील देवपूजा करताना रश्मी काही स्तोत्र,  मंत्र आई आणि ताई आजीचं  ऐकून शिकलेली होती.   देवपूजा करताना रोज प्रथम गणेश स्तोत्र,  जय जगदंबे,  सर्व मंगल मांगल्ये,  मृत्युंजय मंत्र, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळि ते निजरूप तुझे,   मारुती स्तोत्र म्हंटले जायचे. गणेश पूजनाची सुरुवात  करून लाल फ़ुलं दुर्वा वाहून….,

प्रणाम्यम सिरसा देवं  गौरी पुत्रं विनायकं…” म्हणून पूजेची, पर्यायाने दिवसाची सुरवात करायची. क्वचितच त्यात खंड पडे.  

रोज दोन मैल शाळेत चालत जायचे. येताना गरजेच्या वस्तू घेऊन, तितकंच अंतर चालत परत यायचं शरीराला आणि मनाला  या गोष्टींची सवय झाली.  कारण रश्मी आणि चंदा खूप लहान होत्या. लहान मुलं बऱ्याच गोष्टी विनासायास आत्मसात करतात.  त्यांना नवीन वातावरणात स्वत:ला सामावून घेताना फारसे यत्न करावे लागत नाहीत.  समजूतदार चंदा, अक्काला न त्रास देता बरोबर जायची…  कधी बरोबर बाजूच्या मळ्यातील मुली असत तर कधी बाजूच्या वाडीतील मैत्रिणी असत.  काही वेळेस दोघीच रस्ता कापत.  विशेषतः दुकानातून काही सामान घेऊन जातना हमखास मैत्रिणी पुढे निघून जात असतं आणि मग पुढे रश्मी मागे चंदा असा लवाजमा निघे. लहानग्या चंदाला भरभर चालणे नाही जमायचे काही वेळेस तेव्हा, रश्मी आपली “अक्कागीरी” दाखवायची.  लहानग्या चंदाकडे डोळे मोठे करून बघितली की, थकलेली चंदा धावत येऊन रश्मीला गाठायची.  “रमत गंमत चाललेलं कधी पाहिलच नाही.  नेहमी घाई रश्मी अक्काची”, असं वाटायचं चंदाला.  पण सांगणार कोणाला?  

असचं एक दिवस, शाळा सुटल्या नंतर दुकानात गेल्या दोघी आणि दुकानात चिमी पण दिसली.  

“शंकल काका, सवाल दे,” म्हणून चिमीनं एक रुपया ठेवला समोरच्या फ़ळीवर.  

दरम्यान रश्मी आणि चंदानं सामान घेतलं आणि लिमलेट गोळ्या पण घेतल्या वाटेत खाण्यासाठी. 

“शंकल काकाsss,  मला सवाल दे की लवकल.”  चिमीनं, पुन्हा बोबड्या बोलात, जरा जोर लावून आपली वस्तू मागितली आणि रुपया अजून पुढे सरकवला.  दुकानात खूप गर्दी होती.  

“ये चल, इथं सवाल, जवाब कायबी नाय…” म्हणून शंकर काकानं रुपया चिमीकडे सरकवला.   

आता चिमी रडकुंडीला आली.  काही केल्या शंकर काका कडून  तिला सवाल मिळेना. डोळ्यावर आलेले केस कानापाठिमागे सरकवत,  रडतच चिमीनं पुन्हा सांगितलं, “आईनं सांगितलं, आमटीसाठी शंकल काकाच्या दुकानातून सवाल घेऊन ये म्हणून, आणि तुमी कायबी देत नाईसा… ” आता तिला हुंदका फुटला.  

आणि शंकर काका समजून बोलला, “अरे तिला आमसूल देsss”  आणि आमसूल बरोबर ऑरेंज कलरची लिमलेटची गोळी पण दिली चिमीला. तशी आमसूलची पुडी एका हातात घेऊन, दुसऱ्या हाताने  गोळी उचलून पटकन तोंडात टाकली आणि हसत निघाली घरी. गालावर अश्रू  तसेच, पण दात पडलेल्या तोंडावर पण हसू किती गोड दिसत होतं चिमीच्या !

रश्मी खोटं बोलते पण……

दुकानात वेळ गेल्यामुळे, मळ्यात निघायला उशीर झाला रश्मी आणि चंदाला. नेहमी  बरोबर असणाऱ्या सीमा, रुक्मी, मिरा,  शांतला,  सुरेखा पुढे निघून गेल्या होत्या. दोन शेत मालकांच्या शेतातून छोटीशी पायवाट होती.  गाव देवाच्या नावे एक वळू सोडलेला होता. तो प्रचंड धिप्पाड आणि शक्तीमान होता. त्याला कोणत्याही प्रकारची दोरी किंवा वेसण घालून बंधनात ठेवलेलं नव्हतं. सोडलेला वळू, पिकात घुसून नासाडी करू नये आणि इतर जनावरांपासून पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून पाय वाटेच्या एका बाजूला शेत मालकाने बाभळीच्या फांद्याच कुंपण केलं होत, तर दुसऱ्या बाजूला पाण्याचा पाट वाहत असे.  उशीर झाल्यामुळे रश्मी आणि चंदा झप झप  पावलं टाकत  निघाल्या खरं पण पायवाटेवर चंदाचा  वेग मंदावला.  परत चंदा मागे राहिली. 

रश्मी, पाय वाटेवर मोठा पाण्याचा ओहोळ ओलांडून मुख्य डांबरी रोडवर आली तरी, अजून चंदा पाय वाटेवरील बाभळीच्या कुंपणावरील  रंगीं बेरंगी फ़ुलं पाखर पाहत, हालत डुलत येत होती.  ती येईतो पर्यंत थांबून रश्मी आणि चंदा दोघी एकत्र पुढे चालल्या.  परत चंदाचा वेग कमी झाला. आज दोघींच्या पायात चप्पल नव्हते. त्या मुळे साहजिकच चंदा आणखीन सम्भा सांभाळून चालत होती.  कोपऱ्या वरून लाल एस.टी. येताना पाहून रश्मीला आपल्या लहानग्या, चंदा बहिणीची काळजी वाटली. रश्मीन, पाठी असलेल्या चंदाकडे पहात रस्त्याकडेला असलेल्या  शेताच्या बाजूला पडलेल्या बाभळीच्या काटे भरलेल्या फांदीवर पाय दिला.  मोठा बाभळीचा काटा पायात मोडला. बरेच काटे टोचले आणि पायातून रक्त यायला लागलं. “आई ग sss”  असा आवाज ऐकून चंदा पुढे धावली. रश्मी अक्काच्या हातातील दप्तर आणि सामानाची पिशवी बाजूला पडली होते. छोटी चन्दा तिच्याकडे पण दप्तराचे ओझे होते आणि अजून मळ्यात नेणारा अर्धा रस्ता पण कापला नव्हता. अक्काला खूप काटे टोचले, पायातून रक्त येतंय ते बघून चंदा धावत आली आणि तिनं अगोदर अक्काचा काट्यांनीं भरलेला पाय बाजूला घेऊन आपल्या छोट्या हाताने जमेल तेवढे काटे काढले. स्वतःच दप्तर आणि सामानाची पिशवी उचलली आणि लंगडणाऱ्या अक्काचा हात धरून मळा गाठला. 

रक्ताळलेला पाय बघून ताई आजी पहिल्यांदा ओरडली,  “कार्टे, कुठं बघून चालत होतीस?  चालताना समोर बघून चालायचं,  एवढंपण समजत नाही का? ” 

“ह्या चंदीमुळं माझ्या पायात काटे मोडले,” चंदाकडे बोट करून,  रश्मी वस्सकन ओरडली

चंदा गोंधळली.  तिला समजेना, ‘रश्मी अक्का चिडतेय का ❓️ आपल्या मुळे रश्मी अक्काला काटे कसे मोडले?’ ते चंदाला मुळीच समजलं नाही.  

ताई आजीन रोखून रश्मीकडं पहिलं. तशा रश्मीनं पापण्या झुकविल्या.  ताई आजी आणि विनिता समजून चुकल्या  की, रश्मी खोटं बोलतेय.  पण ना विनिता काही बोलली; ना ताई आजी.  स्वतःच्या वेंधळेपण मुळे हिचा  पाय सुक्या  बाभळीच्या कुंपणावर पडला आणि कारण नसताना छोट्या चंदावर आळ घेतेय. चंदा सामान घेऊन रश्मीचा हात धरून आणताना छोट्या मुलीचा केविलवाणा चेहरा आणखी बारीक झाला होता.  तिच्या चेहऱ्यावर आक्का बद्दलची काळजी  स्पष्ट दिसत होती. पण चंदाने तिला उलट उत्तर दिलं नाही की, रागावली नाही. अजूनही, मोडलेला  काटा अक्काच्या पायातून ताईआजी व आई सुईनं टवकारून काढताना त्रास होतोय हे व्याकुळ होऊन पाहत होती.  तिच्या टपोऱ्या काळ्याभोर डोळ्यात रश्मी अक्का बद्धल काळजीच दिसत होती. काटा सहज निघणार नाही हे दिसून आल्यावर ताई आजीने प्रयत्न सोडून दिले.  

          शेवटी  हातपाय धुवून, लक्ष्मी मंदिरात, तुळशी जवळ आणि देवाला दिवा लावला. सगळ्यांनी  प्रार्थना म्हंटली.  गरम गरम जेऊन घेतले मुलांनी.  लाल कुंकू आणि लोणी कालवून काटा मोडला होता तिथं ताई आजीने लेप दिला.  थकल्यामुळे दोघी गाढ झोपी गेल्या.  
सर्व कामाची आवराआवर करून विनिता मुलींजवळ आली. शांत झोपलेल्या सई, चंदा आणि रश्मीकडे पाहिले. अंगावरच पांघरूण सरळ केलं चंदाच्या डोक्यावरून हात फिरवला. लहानग्या चंदाचं कौतुक वाटलं तिला. किती सांभाळून घेऊन आली रश्मीला, अगदी हाताला धरून. परिस्थिती पाहून लहान बाळ मोठया माणसाच्या भूमिकेत शिरली. बर आजिबात अवडंबर नाही माजवलं. आणि रश्मीच्या कांगाव्यानंतर उलट उत्तर पण नाही दिलं. तिला आपल्या बहिणीच्या शब्दापेक्षा तिच्या पायातील काटा जास्त बोचरा वाटला.
विनिताला, हल्ली रश्मी चिडचिड करताना दिसत होती. आणि लहान चंदा नाहक त्रास सहन करत होती.

नाडकर्णी वाड्यात ताई, काका, काकू, बहिणी, बाबांकडून खुप लाड करून घेणाऱ्या रश्मीवर अचानक आपल्या छोटी बहीण चंदाची काळजी घ्यावी लागत असे. मोठी बहिण असणं म्हणजे जबाबदारी आणि काळजीवाहूपणाचं होता. काहीही उलट उत्तर न देता सर्व काम केल तरी तिला आपल्यावरचं आईच प्रेम कमी झाल्याचं जाणवतंय का? की आपण लहानग्या चंदा आणि सई कडे जास्त लक्ष्य देतो म्हणून चिडचिड करते?


श्री… गेल्या पासून ताईचं रश्मीकडे पूर्वीसारखं लक्ष नाही दिसत. काल काटे भरल्या पायांनी रश्मी घरात आली तेव्हा, ताईंनी प्रथमच “कार्टी” म्हणून संबोधलं होत. रश्मी हीच सर्वात लाडकी नातं होती ताईंची. रश्मीचं खाणं, आंघोळ सारं त्याचं पाहत होत्या. जेवणानं भरलेल्या पोटावर आग्रहानं दूध आणि केळी खायला देऊन देऊन तिला गोलमटोल बनवली होती. श्री… म्हणजे स्वत:च्या मुलाच्या, अचानक अर्धा संसार सोडून जाण्यानं, उन्मळून पडली ती माऊली. पण हे लहानग्या मुलींना कसं समजणार???? जमीनीला पाट टेकून पण विनिता बराच वेळ तळमळत होती. बाजूलाच झोपेचा प्रयत्न करणाऱ्या ताईला सर्व जाणवत होत. चारी डोळ्यातून गरम अश्रू वाहत होते. प्रत्येकाला वाटत होत की, ते दुसऱ्या डोळ्याला समजू नये.

सकाळी उठल्या उठल्या रश्मीनं पहिलं, मोडलेला  काटा आपोआप  वर आला होता आणि पायाची ठसठस पूर्णपणे नाहीशी झाली होती.  आता तिला सरळ चालता येत होतं. हातात ताम्हण घेऊन गुलाबी जास्वन्द, मुक्या कळ्या, झुबका लाल जास्वन्द, पारिजात, गुलाब, पिवळा संकेश्वर, तुळशी आणि दुर्वा आणल्या.  अंघोळ करून पूजा करण्यासाठी सुरवात केली. पण आज काही केल्या संकटनाशन स्तोत्र आठवेना. दिवा लावला, अगरबत्ती लावली,   देव धुतले,  पुसले,  हळद कुंकू वाहिलं. छोट्या बाळकृष्णाला चंदन लावलं,  गणपतीला अष्ट गंध वाहीले पण रश्मीचे तोंड एकदम गप्प.  रश्मी डोक्याला ताण  देऊन आठवायचा प्रयत्न करत होती पण तिला गणपती स्तोत्राची सुरुवात आठवेना.  ताई आजीनं टोकलंच शेवटी “गप्प राहून पूजा करतेस का, रश्मी ? “

“आई, मला गणपती स्तोत्राची सुरुवात आठवेना. रोज म्हणते ते स्तोत्र आजिबात आठवत नाही आहे”.  

“बोल खोटं अजून,  लहान मुलीवर आळ घेतेस,  तिच्यामुळं काटे टोचले म्हणतेस, कस आठवेल तुला? बाप्पाला पण आवडत नाही खोटं बोललेलं. तू तर लहान मुलीवर आळ घेतलास खोटा खोटा. “अक्का, अक्का”, म्हणून प्रेमाने पाठी येणाऱ्या छोटया बहिणीना भीती घालते. डोळे मोठे 🙄करून, दोघी लहान बहिणींना घाबरवते. मग कस आठवेल तुला, “प्रणाम्याम शिरसा देवं….  ” ताई  आजीनं रश्मीला तिच्या चुकीच्या वागण्याची जाणीव तर करून दिलीच पण स्तोत्र आठवायला मदत पण केली. नां तिनं चंदाची माफी मागायला सांगितली नां चुकीबद्धल शिक्षा केली. आता रश्मीनं फ़ुलं आणि दुर्वा वाहता वाहता गणपती स्तोत्र म्हणायला सुरुवात केली.  🙏🌹🌺

प्रणाम्यम् शिरसा देवम् गौरी पुत्रंम् विनायकम् , 

भक्त्या वासम् स्मरे नित्यम्मानु कामार्थ सिद्धये 

प्रथमम् वक्रतुंडच, एक दंतम द्वितियकं….  

……………………..

………………………….

इति श्री नारद पुराणे………..  संपूर्णम. 🙏

चंदा एकटीच कुठे राहिली?

आज शनिवार,  शाळा सुटली आणि सर्व चिमण्या, पाखरं किलबिल करत घरट्याकडे निघाली.  दप्तर घेऊन रश्मी, चंदाची वाट पाहत वर्गाबाहेर रस्त्यावर थांबली होती.  जशी चंदा आली तशा दोघी शाळा,  मस्जिद,  शमशादच घरं,  जीनगराचं हॉटेल,  सरकारांचा वाडा, मुल्लाचं दुकान, सुतार आळी, आक्कूच घरं, तान्हींबाई, शोभाचं घर ओलांडून चालत पुढे आल्या. नाडकर्णी वाडा दिसला, तशा दोघी आत शिरल्या.  एक एक पायरी वर चढुन, “काकू ssss” म्हणून चंदा आत धावली. काकू आपल्या कामात मग्न होत्या.   हसून “ये, ये चन्दा,  ये रश्मी”  म्हणून बोलावलं.  “नानाकाकाsss”  म्हणून चंदान दप्तर भिंतीला लागून ठेवलं आणि आत धावली. काकांच्या मांडीवर बसून गंमती, जमती सांगत होती. चंदा एकदम खुश होती,  उमेश,  गणेश आणि शिवम या आपल्या भावांबरोबर  आणि काकांबरोबर रमली.  आता बराच वेळ झाला होता. चंदाचा पाय काही वाड्यतून निघेना. “मी काकांजवळ राहणार”,  चंदाने, रश्मीला सांगून टाकले.  चंदा, नाना काका आणि काकूंची खूपच लडकी होती. तिनं फर्माईश केली, “काकू आज मला रताळ्याची पोळी पाहिजे. आज मी नाही जाणार मळ्यात”, म्हणून सांगून मोकळी झाली. आता ती एकदम खुश होती. बऱ्याच दिवसांनी काकांच्या मांडीवर बसून स्वत:चे लाड करून घेत होती  आणि आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. “अरे, आमची चंदाराणी आली” म्हणून  काका पण खुश झाले. विनिता आई वाट पहाते म्हणून  रश्मी, दप्तर घेऊन एकटीनचं माळ्याची वाट धरली.  

चंदा, लहान,  लाघवी स्वभाव,  चुणचुणीत,  हुशार,  हजर जबाबी म्हणून सगळेच तिचे लाड करत असत.

मळ्यात,   रश्मी बरोबर चंदा आली नाही म्हणून ताई आजी,  आई आणि छोटी सई सगळे एकदम “चन्दा कुठं आहे?” म्हणून प्रश्नlर्थक मुद्रेने पाहू लागले. “आज चंदा नाना काकांकडे राहिली”.   म्हणून सांगितल्यावर रोखलेले श्वास हुशsss करून सोडले गेले.  

चंद्रयाला पाटलीण बाईनी का मारलं..?

गावांत बारा बलुतेदार एकत्र नांदत होते. सरकारांचा वचक होता. सर्व धर्म, सर्व जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. गावच्या समस्या शक्यतो तिथंच सोडवल्या जायच्या. गावच्या वाहिनी साहेबांनी आणि गावच्या पाटलीण बाईंनी विनिताला वाड्यावर बोलावून घेऊन आश्वासित केल. “मळ्यात राहायला गेलीस तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. काही मदत हवी असेल तर मध्यरात्री पण तुला आमचं दार उघड असेल,” या त्यांच्या आश्वासनाने विनिताला बर वाटलं.
कुलकर्णी, नाडकर्णी, पंडित, पेशवे, जोशी जसे गुण्या गोविंदाने नांदत होते तसेच सुतार, लोहार, कुंभार, शिंपी, धनगर आणि इतर लोक आपापल्या कामानं गाव समृद्ध केला होता. जशी गाव देवाची यात्रा भरे, तसाच ताबूत फिरे. शाळेजवळ मंदिर होते तसचं मस्जिद पण होती. गावाबाहेर पण वस्ती होती. गावातील तिन लोक मिलिटरी मध्ये काम करत होते. सर्वांना त्यांचा अभिमान होता.
शाळेत सर्व मुलं समान होती. तिथं कसलाही भेदभाव नव्हता. गुरुजी म्हणजे भावी पिढी घडविणारे चालते बोलते ज्ञानाचे भांडार होते. पण

माणूस आला, तिथं विकार आला..

श्रावणातला सोमवार, पावसामूळ सर्व शेती हिरवीगार दिसत होती. मध्येच पावसाची सर आली की पानाफुलांवर पडलेलं पाणी सूर्यकिरणांनी प्रतिबिंबित होऊन प्रकाश किरण प्रज्वलित झाल्याचा भास होई. मधेच मोठी सर येई आणि एकदम लख्ख ऊन पडे. कधी ऊन, पाऊस एकत्र येत आणि आकाशात निसर्गाचं अनोख रूप, सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसें आणि कोल्ह्याच कुई कुई ओरडणं ऐकू येई. मोराचा केकारव ऐकून त्याला पाहण्यासाठी बाहेर पडावं तर समोर नारळाच्या बागेत किंवा आवळ्याच्या, आंब्याच्या झाडा खाली पंख पसरून मोराचा नाच चालू असे. पावसाच्या सरींमुळे वातावरण प्रफुल्लित आणि मन आनंदानं भरून येई.
सई आता शाळेत जायला लागली होती. आज श्रावणी सोमवार म्हणजे अर्धा दिवस शाळा. रश्मीने आज लवकर घरी येऊ म्हणून सांगितलं होतं. आणि म्हणूनच विनिता तिघींची वाट पाहत होती. आता रश्मी पाठी, सई आणि चंदा एकमेकींचा हात पकडून येत. गावांत फक्त इयत्ता सातवी पर्यंत शाळा होती. आठवी साठी तीन मैलावर असलेल्या शाळेत जावे लागे. रश्मी सातवीला असल्याने केंद्राच्या ठिकाणी वार्षिक परीक्षा देण्यासाठी जावे लागणार होते. गुरुजी वर्षाच्या सुरुवाती पासूनच तयारी करून घेत होते. चंदा, सईला पुढ जाण्यास सांगून रश्मी शेवटचे लिखाण संपवून सर्वांबरोबर बाहेर पडली. दरम्यान चंदा, सईनं बराच रस्ता कापला होता. रश्मी घाईनं दोघीना गाठण्याचा प्रयत्न करत होती. आता तिला दूरवर नजरेच्या टप्प्यात दोघी दिसत होत्या. मोठं वाडाचं झाड पार करून, डांबरी रस्ता बदलून, रश्मी बैलगाडीच्या वाटेला लागली. तेव्हा सई आणि चंदानी एक दुसरीचा हात पकडून ओहोळ पार केला. आणि पाठी वळून पाहिलं. त्यांना राश्मी अक्का दिसली पण तिच्या समोर एक धिप्पाड दिसला. हा मुलगा कोण होता ? खूप पुढे पोहोचलेल्या चंदा आणि सई या आपल्या बहिणी कडे पहात असताना हा चंद्र्यानं बाजूच्या ज्वारीच्या शेतातून एकदम समोर आल्याने रश्मी एकदम घाबरली. पण बाजूला होऊन एकदम जोरात पळत सुटली. तो काय बोलला, हे तिला समजले नाही. पण त्याची भीती वाटली रश्मीला. किळस वाटली त्याच्या बद्दल. धावतच तिनं चंदा आणि सईला गाठलं.
सूर्या, चंदाच्या वर्गात होता. त्याचा मोठा भाऊ चांद्रयानं, मध्येच शाळा सोडली होती. गावकुसाबाहेर राहात होता तो. त्यांचं शेत, रश्मीच्या मळ्याच्या पुढे आहे हे सर्वाना माहित होते. आज पर्यंत त्याची भीती वाटत नव्हती रश्मीला. पण केस विस्फlरलेला, लाल डोळ्याचा, मळके कपडे घातलेला चंद्रया, घाणेरडा भासला एकदम…

दुसरे दिवशी विनिता, रश्मी – चंदाला घेऊन पाटलीण बाईंच्या घरी उभी होती आणि, “वैनी साब, चुकलो मी, चुकलो मी, मला माफ करा. मी नाय जाणार त्यांच्या वाटेला” म्हणत चपलेच्या मारापासून अंग चोरत कळवळत होता आणि “बामणाच्या पोरीची वाट अडवतोस काय रे चंद्रया?” म्हणून पाटलीण बाई जोरजोरात चपलेने मारत होत्या. त्यानंतर कधीच तो तिघींच्या वाट्याला गेला नाही. तिघी बहिणी दुरून दिसल्या तरी चंद्रया रस्ता बदलून, वेगळ्या वाटेनं जायचा.

5 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

“तू सदा जवळी रहा…” भाग – 55*

भाग – 41* सर्व गुणसंपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

🙏🌍 धरती 🌍🙏

🌍🍚🌹🍇👣👨‍👩‍👧‍👧🏄‍♀️🐠🐥🐯🍑🏠🌈 पृथ्वी म्हणा, भूमी म्हणाकोणी म्हणा 🌏 धरा, सुप्रभाती नित्त्याने ‘महि’मातेला प्रथम प्रणाम करा 🙏🌍🙏🌍🙏🌍 जन्मापासून पोषण करतेकर्म 🍚 करत राहते,सांगत नाही, 🤫 बोलत नाहीश्रेय

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 54*

भाग – 41* सर्वगुण संपन्न, वेगळ्या पद्धतीने – दिन विशेष, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केले रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 53* अर्थात स्थित्यंतर पुर्व स्थिती

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More